डॉ.नानासाहेब थोरात’ यांना युरोपयिन कमशिनचा तीन कोटी रुपयांचा संशोधन प्रकल्प जाहीर

डॉ.नानासाहेब थोरात’ यांना युरोपयिन कमशिनचा तीन कोटी रुपयांचा संशोधन प्रकल्प जाहीर
महिलांमधील कॅन्सर लसीच्या संशोधनासाठी होणार मदत
मायणी : विशेष प्रतिनिधी ( कुंदा कांबळे )
मूळचे सातारा जिल्ह्यातील मायणी गावचे रहिवासी आणि सध्या आयर्लंड देशातील लिमेरिक विद्यापीठात कॅन्सर विषयांचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉ. नानासाहेब थोरात यांना युरोपयिन कमशिनकडून महिलांमधील कॅन्सरवरती लस संशोधनासाठी तीन कोटी रुपयांचा संशोधन प्रकल्प व पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. युरोपियन कमिशनच्या मेरी-क्युरी Principal Investigator अंतर्गत हा संशोधन प्रकल्प असून महिलांमधील ब्रेस्ट आणि ब्रेन कॅन्सरवरती लस शोधण्यासाठी हा संशोधन प्रकल्प उपयोगी पडणार असून पुढील तीन वर्षांसाठी त्यासाठी हा निधी देण्यात येणार आहे. सण २०२० ते २०२4 पर्यंत ‘ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी’च्या ‘मेडिकल सायन्स’ विभागात संशोधक असलेल्या डॉ. नानासाहेब थोरात’ यांचे शालेय शिक्षण मायणीमध्ये, महाविद्यालयीन शिक्षण विटा तर पदव्यूत्तर आणि पीचडी पर्यंतचे शिक्षण कोल्हापूर मध्ये झाले. फिजिक्स विषयात शिवाजी विद्यापीठातून एमएससी तर डी वाय पाटील विद्यापीठ कोल्हापूर मधून पीएचडी केल्यानंतर पुढील संशोधनासाठी ते परदेशी गेले. सन २०१४ पासून डॉ. थोरात यांनी दक्षिण कोरिया, जर्मनी, पोलंड, स्वित्झर्लंड, इंग्लंड आणि आयर्लंड या देशांमधील संशोधन संस्था आणि विद्यापीठे यामध्ये संशोधनाचे कार्य केले आहे. डॉ. थोरात मेडिकल फिजिक्स आणि मेडिसिन विभागामध्ये एमबीबीएस आणि एमडीच्या विद्यार्थ्यांना न्यूरोसायन्स आणि ब्रेन कॅन्सर या विषयाचे त्यांनी अध्यापन करत आहेत.
जगभरात महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक असते, त्यावरती सध्या रेडिएशन आणि किमोथेरपी दिली जाते या दोन्ही उपचारपद्धती प्रगत म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील कॅन्सरवरती उपायकारक ठरत नाहीत, काही वेळेला हा कॅन्सर ट्युमर शस्त्रक्रिया करून काढला जातो पण त्यातूनही हा कॅन्सर पुन्हा होण्याची शक्यता अधिक असते. जगभरातील शास्त्रज्ञ याला पर्याय म्हणून नवीन उपचारपद्धती शोधत आहेत. त्यापैकी एक आहे ती कॅन्सर रुग्णांच्या ट्युमरच्या पेशी घेऊन त्या प्रयोशाळेत अभ्यासून त्यावरती लस तयार करायची जी फक्त त्याच रुग्णाला दिली जाईल आणि ती लस कॅन्सर रुग्णाची प्रतिकारशक्ती वाढवेल आणि त्याचजोडीला कॅन्सरचे औषध म्हणूनपण कार्य करेल. सुमारे ४० % स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर काही दिवसानंतर ब्रेनमध्ये पसरतो अशा वेळेला आता अस्तित्वात असलेली उपचारपद्धती निरुपयोगी ठरते आणि रुग्णाचे आयुष्यमान काही महिन्यांवर येते. अशा तिसऱ्या किंवा चौथ्या टप्प्यातील कॅन्सरवरती आधुनिक आणि वैयक्तिकृत ज्याला Personalised Medicine म्हणतात त्यावरती संशोधन करण्यासाठी डॉ. थोरात आणि त्यांच्या टीमला हा प्रकल्प मिळाला आहे.
डॉ. थोरात यांचे सन २०१२ पासून कॅन्सरवर एकशे पंचवीसपेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय संशोधन पेपर, आठ आंतरराष्ट्रीय पुस्तके, तीन आंतरराष्ट्रीय पेटंट (इंव्हेशन्स) आणि पंचवीसपेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय पुस्तकामध्ये पुस्तक अध्याय प्रसिद्ध झाले आहेत. एका सर्वसामान्य कष्टकऱ्याचा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी ते जगविख्यात संशोधक हा खडतर प्रवास संघर्ष, संधी आणि संशोधक वृत्तीतून त्यांनी केला आहे. तो सगळ्यांनाच प्रेरणादायी आहे.संशोधक डॉ.नानासाहेब थोरात’ यांना युरोपयिन कमशिनकडून महिलांमधील कॅन्सर संशोधनासाठी तीन कोटी रुपयांचा संशोधन प्रकल्प व पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे .त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.