औंध येथे आज श्री यमाई देवीचा रथोत्सव

औंध येथे आज श्री यमाई देवीचा रथोत्सव
# औंध- महेश यादव उपसंपादक #
ग्रामदेवता, स्थानदेवता, सर्व जाती वर्णांची श्रद्धेय देवता आणि असंख्य कुटुंबियांची कुलस्वामिनी म्हणून ‘यमाई’ देवी सर्वांना परिचित आहे. ‘यमाई’ हे पार्वती, दुर्गा, रेणुका, यल्लमाचेच एक रूप मानले जाते. यमाई देवीबद्दल आणखी एक गोष्ट सांगितली जाते, ती अशी प्रभू श्रीरामचंद्र वनवासात असताना रावणाने सीतेला मायावी रूप धारण करून फसवून पळवून नेले. त्यामुळे श्रीराम अतिशय शोकाकूल झाले व सीता सीता अशा हाका मारीत सर्वत्र शोध घेऊ लागले.
सीतामाईंचे वर्णन करीत समोर येणाऱ्या प्रत्येकास सीतामाई पाहिलीत कां? असे विचारू लागले. अशा या शोकमग्न अवस्थेत त्यांना धीर देऊन शांत करणे आवश्यक होते. हे काम करण्यास तेवढीच सामर्थ्यवान व्यक्तीची गरज होती. तेव्हा आदिशक्ती, आदिमाया पार्वतीने सीतेचे रूप धारण केले आणि ती श्रीरामांपुढे येऊन उभी राहिली. पण अशा अवस्थेत सुद्धा श्रीरामांनी पार्वतीला ओळखले आणि आदराने * दंडवत घालत बोलते झाले, “येऽमाई” तेव्हापासून ह्या देवतेला यमाई हे नाव प्राप्त झाले.
हीच ती असंख्य भाविकांची, भक्तगणांची आधारवड असलेली औंधस्थित यमाईदेवी होय.
यमाईदेवीची महाराष्ट्रात सुमारे तीस मंदिरे असून त्यातील नगर जिल्ह्यातील राशीन, पुणे जिल्ह्यातील *कण्हेसर, सोलापूर जिल्ह्यातील माडीं आणि सातारा जिल्ह्यातील किन्हई व औंध ही प्रसिद्ध आहेत.
औंधची श्री यमाई देवी हे पंतप्रतिनिधींच्या घराण्यांचे दैवत आहे.
यमाईदेवीचे स्थान स्वयंभू व जागृत असल्याने महाराष्ट्र, कर्नाटक इ. प्रांतातील लाखो भाविक प्रतिवर्षी या देवीदर्शनासाठी येतात. ही देवी नवसास पावते, आपदा मिटविते आणि समृद्धी प्राप्त करून देते अशी या देवीची ख्याती आहे. तसे सद्भक्तांचे अनुभवही आहेत.गावातील राजवाड्याच्या आवारातही श्री देवीचे भव्य मंदिर आहे. या मंदिरासमोर उंच १७६ दिव्यांची सोय असलेली दीपमाळ व नगारखाना आहे.
श्री यमाई देवीचे मुख्य देवस्थान (मूळपीठ) डोंगरावर,गावाच्या दक्षिणेस आहे. मंदिरापर्यंत सहजतेने जाण्यासाठी ४३२ पायऱ्या आहेत. मार्ग अतिशय सुशोभित आहे. तसेच गाडीने वर जाण्यासाठी रस्ताही आहे.
जसा ज्याचा भाव तसा त्याचा अनुभव हे साधेसमिकरण आहे.कुलस्वामिनी ही कुटुंबाची तारणहार असते. तिची उपासना ही निश्चित फलप्रद ठरते. आपण जितक्या आर्ततेने तिला साद घालू तेवढ्याच तत्परतेने ती प्रतिसाद देते. उत्सवामध्ये तसेच घरामध्ये हा शुभकार्य झाल्यावर देवीच्या दर्शनास येऊन तिची खणानारळाने ओटी भरून भोगी/शिधा, दक्षिणा देण्याचा हा कुळाचार कुलबांधवांकडून पाळला जातो
अंबे, पार तुझा अपार महिमा, त्रैलोक्य विस्तारला । कीर्तीच्या गजरें करूनि शिव हा, ध्यानी तुझे बैसला ।। देवेंद्रांदिक देव सर्व अवघे, सत्तें तुझ्या वर्तती । अंबेवांचुनि थोर आणिक नसे, वेदांतही बोलती ।।
https://youtu.be/qUpCegw2F-g?si=0TZyw3sNsK1Ru4db