जिल्हा पोलिस दलाकडून किल्ले भुषणगड येथे स्वच्छता मोहीम.
माझे गड किल्ले, माझी जबाबदारी हा संदेश

जिल्हा पोलिस दलाकडून किल्ले भुषणगड येथे स्वच्छता मोहीम.
माझे गड किल्ले, माझी जबाबदारी हा संदेश
पुसेसावळी प्रतिनिधी….. समद आत्तार.
आपल्या परिसरातील गड,किल्ल्यांचे संरक्षण व संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे.निरंतर स्वच्छता राखल्याने गड,किल्यांचे पावित्र्य जपले जाईल.सर्वच नागरीकांनी आपआपल्या परीने गड,किल्यांची स्वच्छता व डागडूजी करण्यासाठी पुढाकार घ्यावा,असे आवाहन सातारा जिल्हा पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी केले.
भूषणगड(ता.खटाव)येथे आपले गड,आपली जबाबदारी व गडभ्रमंती या उपक्रमांतर्गत स्वच्छता मोहिम राबविण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.यावेळी दहिवडी उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे,औंध पोलीस स्टेशनचे सपोनि दत्तात्रय दराडे,दहिवडीचे सपोनि अक्षय साेनवणे,म्हसवडचे सपोनि राजकुमार भुजबळ यांची उपस्थिती होती.
दरम्यान,व्याख्याते मानसिंग कदम यांनी छत्रपती शिवरायांच्यापासूनचा भूषणगडाचा इतिहास उपस्थितांना सांगितला.गडाचे बुरुज व महत्वाच्या वास्तूंची सुरु असलेली पडझड रोखण्यासाठी शासन,प्रशासन,शिवप्रेमी ग्रामस्थांनी योग्य नियोजन करून या वास्तूचे संवर्धन करावे व ऐतिहासिक वारसा जपावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
भूषणगडाच्या पायथ्यापासून माथ्यापर्यंत पडलेला कचरा 10 अधिकारी,सुमारे 60 पोलीस कर्मचारी,पोलीस पाटील,शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते व सुमारे 200 ग्रामस्थांच्या मदतीने गोळा करण्यात आला.सदरचा कचरा कंपोष्टसाठी पाठवण्यात आला.पुसेसावळी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने ट्रॅक्टर-ट्राॅलीतून कचरा वाहून नेण्यात आला.सातारा पोलीसांच्यावतीने सुरु असलेली ही आठवी मोहिम होती.