मायणी वीज वितरण कंपनी विरोधात ग्रामस्थांचा रास्ता रोकोचा इशारा
लाईट बिल न भरण्याचा ग्रामस्थांचा निर्णय मायणी

मायणी वीज वितरण कंपनी विरोधात ग्रामस्थांचा रास्ता रोकोचा इशारा
लाईट बिल न भरण्याचा ग्रामस्थांचा निर्णय
मायणी
मायणी—–प्रतिनिधी
गेल्या एक महिन्यापासून मायणी व परिसरातील वीजपुरवठा विनाकारण खंडित केला जात असून व वारंवार त्यात अनियमितता असल्याने नागरिकांना नाहक त्रास होत आहे.त्याचबरोबर व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. शिवाय त्यामुळे पाणीपुरवठाही विस्कळीत होत असल्याने आज मायणी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मायणी ग्रामस्थांनी व महिलांनी हल्लाबोल चढवला.वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा येत्या सात दिवसात पूर्ववत न केल्यास व विनाकारण वारंवार वीज पुरवठा खंडित केल्यास वीज वितरण कंपनी विरोधात रास्ता रोको करण्याचा, त्याचबरोबर लाईट बिल न भरण्याचा इशारा मायणी ग्रामस्थांनी दिला आहे.
तशा आशयाचे निवेदन मायणी ग्रामपंचायतीच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठांना देण्यात आले. यावेळी सरपंच प्रतिनिधी रणजीत माने,मार्केट कमिटीचे संचालक स्वप्निल घाडगे,सोसायटीचे चेअरमन अनिल माळी, ग्रामपंचायत सदस्य हेमंत जाधव,किशोर माळी,महादेव माळी,युवराज भिसे,डॉ.विकास देशमुख,पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश जाधव,अरुण भिसे,इब्राहिम तांबोळी,मन्सूर नदाफ,प्रशांत सनगर,डॉ.तबीब, चेतन लांब,विशाल चव्हाण,अतुल सुरमुख,मोहन दगडे, विजय कदम आदी मान्यवर व ग्रामस्थ,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.पोलीस विभागालाही निवेदन देण्यात आले यावेळी हवालदार आनंदा गंबरे, कॉन्स्टेबल संदीप खाडे, बापू शिंदे,पोलीस पाटील प्रशांत कोळी उपस्थित होते.
गेल्या अनेक दिवसापासून मायणीतील वीजपुरवठा तासंतास खंडित होत असल्याने लोकांना त्याचा नाहक त्रास होत आहे. मायणी परिसरातील मोठी बाजारपेठ असल्याने व्यापारी,हॉस्पिटल,अतिदक्षता विभाग,शाळा,कॉलेज यांना विजेची नितांत गरज असते. शिवाय मायणीतील लाईट बिल वसुलीबाबत कोणतीही तक्रार नसताना मायणीकरांना वीज वितरण कंपनी वीज पुरवठा खंडित करून लोकांना नाहक त्रास देत आहे. त्यामुळे आज मंगळवार दिनांक १६ मे रोजी मायणी ग्रामस्थांनी,महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन वीज वितरण कार्यालयावर हल्लाबोल चढवला.
यावेळी वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता संतोष दिवटे, सहाय्यक अभियंता प्रशांत लांबतुरे,रामदास पिसाळ,नवनाथ माळवे व सर्व कर्मचारी यांना मायणी ग्रामस्थांनी घेराव घातला व वीज पुरवठा का खंडित केला जातो याबाबत खडसावले. त्यावर उपकार्यकारी अभियंता संतोष दिवटे यांनी येत्या काही दिवसात मायणीचा वीज पुरवठ्याचा प्रश्न कायमचा सोडवण्यात येईल असे आश्वासन दिले. व मायणीतील वीज वितरण कंपनीच्या अपुऱ्या कर्मचारी वर्गाची ही पूर्तता करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाला आम्ही कळवू असेही सांगितले. जर कोणी कर्मचारी मुद्दाम अशा गोष्टी घडवत असेल तर अशा कर्मचाऱ्यावर आम्ही योग्य ती कारवाई करणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
मायणी ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की येथील विद्युत वितरणात फार मोठ्या प्रमाणात अनियमितता व सावळा गोंधळ निर्माण झाला आहे. मायणीसाठी शाखा अभियंता नियमितपणे हजर नसल्यामुळे कर्मचारी यांची मनमानी होत आहे. ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण केले जात नाही. पाणीपुरवठाच्या संदर्भातील तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. ग्राहकांना कर्मचारी उद्धट व अपमानकारक उत्तरे देतात. कर्मचारी फोन कॉलला प्रतिसाद देत नाहीत प्रतिसाद दिलाच तर भाषा अत्यंत मगरुरीची असते परमिट घेतल्यानंतर तातडीने कामाची पूर्तता न करता टाळाटाळ केली जाते. मायणी ग्रा.पं. हद्दीतील ठेकेदार यांच्याकडून केबल टाकण्याचे काम सुरु आहे त्यामुळे पूर्वी मंजुर असलेल्या स्ट्रीट लाईटच्या ठिकाणचे पथदिवे बंद करण्यात आलेले आहेत. ते ठेकादार यांना सांगून तातडीने पुर्वत करण्यात यावे.अन्यथा रस्ता रोको करण्यात येईल.