नियमित नळाद्वारे पाणीपुरवठा करा, अन्यथा सरपंच, उपसरपंचांनी राजीनामा द्यावा. युवा नेते गौरव जाधव

नियमित नळाद्वारे पाणीपुरवठा करा, अन्यथा सरपंच, उपसरपंचांनी राजीनामा द्यावा. युवा नेते गौरव जाधव
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम
मुबलक पाणीसाठा व वितरण व्यवस्था उपलब्ध असूनही ग्रामपंचायत प्रशासन पुसेगावकरांना नियमित पाणी देण्यात अपयशी ठरत आहे. नियोजनाचा अभाव असल्याने गावातील पाणीपुरवठा पूर्णतः विस्कळीत झाला आहे. पाणीटंचाईंने महिला व नागरिक त्रस्त झाले आहेत. पुसेगावकरांना नियमित नळाद्वारे पाणीपुरवठा करणे जमत नसेल तर पुसेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त गौरव जाधव यांनी केली.
पुसेगाव येथे ते पत्रकारांशी बोलत होते. श्री. जाधव पुढे म्हणाले, गेल्या दोन दशकांपासून एक, दोन आणि आता चार दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. पण त्यातही सातत्य राहिलेले नाही. काही भागात पाचव्या दिवशी पाणीपुरवठा होतो, तर अनेक भागांमध्ये सहाव्या, सातव्या दिवशी पाणी पुरवठा केला जात आहे. पाणी वितरणातील ही विषमता देखील नागरिकांसाठी त्रासदायक ठरू लागली आहे. कित्येकदा महिला व नागरिकांना कामधंदा सोडून चातकासारखी पाण्याची वाट बघत बसावे लागते. दररोज पाण्याची काटकसर करताना पुसेगावकरांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे वास्तव आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे पुसेगावात पाण्याची बोंबाबोंब पाहायला मिळत आहे. ग्रामपंचायत प्रशासन पुसेगावकरांकडून ३६५ दिवसांची पाणीपट्टी वसूल करत असताना आठ दिवसांतून एकदा पाणी पुरवठा करते, ही अव्यवहारी गोष्ट आहे. पाण्याअभावी नागरिकांचे दररोज हाल होत असून, कधी-कधी तर महिला व लहान मुलांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. पुसेगावकरांना दिलासा देण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करावे, अन्यथा आम्ही ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकण्याचा तयारीत आहोत.
पुसेगावमधील सार्वजनिक शौचालयांच्या दुरुस्ती आणि स्वच्छतेच्या गंभीर प्रश्नाकडे ग्रामपंचायत प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. नागरिकांना दररोज नाहक त्रास सहन कराव्या लागणाऱ्या सार्वजनिक शौचालयांचा प्रश्न ग्रामपंचायतीने तातडीने सोडवावाअन्यथा ग्रामस्थ कायदा हातात घेण्याच्या तयारीत असल्याचे युवा नेते गौरव जाधव यांनी सांगितले.