संवाद-तक्रारदारांशी या उपक्रमाचा तक्रारी सोडविण्यास फायदा होईल -अश्विनी शेंडगे.

संवाद-तक्रारदारांशी या उपक्रमाचा तक्रारी सोडविण्यास फायदा होईल -अश्विनी शेंडगे.
मायणी —प्रतिनिधी
पोलीस व नागरिक यांमध्ये सुसंवाद रहावा यासाठी सातारा जिल्हा पोलीस प्रमुखांनी राबविलेल्या संवाद- तक्रारदारांशी या उपक्रमाचा जनतेच्या अडी-अडचणी सोडविण्यास निश्चित फायदा होईल असे प्रतिपादन अश्विनी शेंडगे ,उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी यांनी केले.
मायणी ता. खटाव येथील मायणी पोलीस दुरुक्षेत्रामध्ये पोलीस पाटील, व्यापारी, प्रमुख कार्यकर्ते व पत्रकार यांच्या आयोजित बैठकीमध्ये त्या उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. सदर वेळी मायणी पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक अमोल माने , हवालदार नानासाो कारंडे उपस्थित होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्या पुढे म्हणाल्या, साधारणतः गुन्हे हे बांधा -बांधावरून, शेतीवरून ते छोट्या मोठ्या तक्रारी पासून गंभीर गुन्हे होण्यापर्यंत होत असतात .गाव खेड्यापर्यंत पोलीस पाटील हे कायद्याने निर्माण केलेले महत्त्वाचे पद आहे. या संदर्भात नागरिक व पोलीस पाटलांनी सहकार्याची भूमिका घेऊन पोलीस विभागास सहकार्य करावे. मायणी येथे गलाई बांधवांची दुकाने मोठ्या प्रमाणात आहेत .त्यासाठी या व्यवसायिकांनी आपल्या ज्वेलरीचा मुद्देमालाचा विमा, अलार्म सिस्टीम, जीपीएस सिस्टीम, गुरखा आदी उपाययोजना करून आपल्या मालमत्तेचे संरक्षण करावे .त्याचप्रमाणे आपल्या ज्वेलरीवर आत बाहेर असे सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, रात्रभर आपल्या दुकानावरील लाईट चालू असावी.
शाळा कॉलेजमधील मुलींना त्रास देणाऱ्या रोड रोमिओंवर या पुढील काळात निश्चित प्रमाणे कडक कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे निर्भया पथकाद्वारे परिसरातील सर्व शाळा -कॉलेज यांना मार्गदर्शन करून ज्या ठिकाणी अशा पथकांची गरज आहे त्या संदर्भात पोलीस विभागाशी संपर्क साधावा.
मायणी पोलीस विभागाच्या गैरसोयी संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्या म्हणाल्या, मायणीस पोलीस व्हॅन नाही ती लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येईल, टप्प्याटप्प्याने पोलीस स्टाफ वाढविला जाईल ,त्याचप्रमाणे महिला पोलिसांची देखील नियुक्ती करण्यात येईल. मायणी पोलीस स्टेशनचा रेंगाळलेला प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न केले जातील.खटाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश सुरमुख यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.