कलेढोण येथे भीषण पाणी टंचाई ,महिलांनी काढला हंडा मोर्चा –
पंधरा दिवसातून पाणी अवस्था केविलवाणी

कलेढोण येथे भीषण पाणी टंचाई ,महिलांनी काढला हंडा मोर्चा –
पंधरा दिवसातून पाणी अवस्था केविलवाणी
कलेढोण: प्रतिनिधी
कलेढोण येथे प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गावात पंधरा दिवसातून एकदाच पाणी अन ग्रामस्थांची अवस्था केविलवाणी अशी परिस्थिती आहे.
ग्रामपंचायत कलेढोणचे सरपंच सौ .प्रीती शेटे यांनी वारंवार टँकर मागणीचे प्रस्ताव देऊन देखील शासनाने याकडे डोळेझाक केल्याने रोजच्या टंचाई ला त्रासून अखेर महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढला.
प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला दिवसाला किमान 55 लिटर पाणी मिळावे म्हणून कोट्यवधी रुपये खर्च करून जल जीवन योजनेची निर्मिती केली. यातून अनेक गावामधे जल जीवन योजना राबवल्या देखील गेल्या मात्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे माण – खटाव तालुक्यातील अनेक योजना राबवताना घोटाळे झाले आहेत. याला कलेढोण गाव तरी कसे अपवाद राहील .
जल जीवन योजनेच्या कामाला मंजुरी देणाऱ्या
तत्कालीन अधिकाऱ्याच्या गलथान कारभारामुळे सदर योजना राजकीय विरोधकांच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या वादात अडकून पडली आहे. सदर योजनांची विहीर व पाइपलाइन चे काम पूर्ण असून देखील अधिकाऱ्यांनी ठेकेदाराचे बिल अडवल्यामुळे काम बंद पडले आहे.
त्यामुळे सरकारने कोट्यवधी रुपये खर्च करून देखील दुष्काळी भागातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
गावातील पाणी पुरवठा करणाऱ्या विंधन विहीरी, ग्रामपंचायत मालकीच्या बोअरवेल, तसेच एक किमी अंतरावर असलेल्या खाजगी बोअरवेल विहिरी देखील आटल्याने गेले दोन महिने पिण्याचे आणि जनावरांना लागणारे पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.
वाढता उन्हाळा व खालावलेली पाणी पातळी मुळे परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. पाण्यासाठी
नागरिकांना दूर – दूर पायपीट करावी लागत आहे. कुटुंबातील अबाल वृद्धांपासून सगळ्यांनाच दिवसभर पिण्याचे पाणी आणण्यासाठी रानोरान भटकंती करावी लागत आहे. सर्वसामान्य नागरिकांना दिवसभर रोजगाराला जाण्या ऐवजी पाणी मिळवण्या साठीच कष्ट करावे लागत आहे. दिवसभर नळावर घागर ठेवून देखील नंबर येत नाहीत. तासनतास पाण्याचा नंबर येण्यासाठी बसून रहावं लागत आहे. आमदार, खासदार,लोकप्रतिनिधी केवळ आश्वासन देत आहेत. कोणी काहीच करत नसल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. शासनाने गेले दोन महिने पाणी टंचाई जाणवत असून देखील टँकर सुरू करण्याबाबत कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही.
जवळपास दहा हजार लोकसंख्या असलेल्या गावात
अडीच हजार जनावरे आहेत, मराठी शाळा, हायस्कूल , कुटीर रुग्णालय अशा विविध प्रशासकीय संस्था आहेत.
कुटीर रुग्णालयात प्रसूती करण्यास लागणारे पाणी उपलब्ध नसल्याने गरोदर महिलांची प्रसूती देखील करू शकत नसल्याने आरोग्याच्या समस्या देखील निर्माण होत आहेत. सध्याच्या परिस्थितीत तक्रार बाजूला ठेवून पाण्याची सोय करून देण्याची व्यवस्था शासनाने करणे गरजेचे आहे पण केवळ मी का तू यामुळे जल जीवन योजनेतून गावाला पाणी मिळण्याची आशा मावळली आहे असे दिसून आल्याने
ग्रामपंचायत प्रशासनाने शासनाकडे टँकर मागणी सुरू केली. वारंवार प्रस्ताव देखील पाठवले. खटाव तालुक्यातील कलेढोण व भोसरे ही दोन गावे दुष्काळी म्हणून जाहीर केली आहेत. भोसरे गावात टँकर सुरू आहे, मात्र प्राथमिकता असेलल्या कलेढोण गावात आजतागायत टँकर का सुरू केला नाही. येत्या दोन दिवसात टँकर सुरू केला नाही तर यापेक्षा मोठा हंडा मोर्चा थेट जिल्हा परिषदेवर काढू असा सूचक इशारा हंडा मोर्चा काढणाऱ्या कलेढोणकर जी टंचाईग्रस्त महिलांनी दिला आहे.