चितळी – माहुली रस्त्यावरील पुल गेला वाहून ग्रामस्थांची नदीतील वाट धोकादायक व बिकट

चितळी – माहुली रस्त्यावरील पुल गेला वाहून
ग्रामस्थांची नदीतील वाट धोकादायक व बिकट
मायणी –
चितळी ता. खटाव येथील चांद नदीवरील लोकवर्गणीतून बनलेला ,गावातील अनेक वस्त्या ,शेती आणि दोन जिल्ह्यांना जोडणारा पूल नदीला आलेल्या मोठ्या पुरामुळे वाहून गेल्याने येथील शेतकरी,ग्रामस्थ,विद्यार्थी, यांच्यासाठी संबंधित वाट धोकादायक बनली आहे
याबाबत सविस्तर माहिती अशी, सांगली जिल्ह्यातील माहुली व सातारा जिल्ह्यातील चितळी या महत्त्वाच्या दोन गावांकडे जाणारा महत्त्वाचा मार्ग आजही सार्वजनिक बांधकाम खात्याकडून दुर्लक्षित आहे. नदीच्या पलीकडे अनेक लोकवस्त्या,अनेकांच्या शेतजमिनी आणि सांगली जिल्ह्याकडे जाणारा जवळचा हा मार्ग आहे. या मार्गावरील चांद नदी वर पुलाची निर्मितीच झाली नसल्याने ग्रामस्थांनी आपल्या स्वखर्चाने लोकवर्गणी गोळा करून याठिकाणी तात्पुरता साकव निर्माण करून लोकांची होणारी गैरसोय थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु गतवर्षी हा पूल वाहून गेला त्यावेळी पुन्हा लोकवर्गणी काढून संबंधित साकव पुल निर्माण करण्यात आला.
यंदा नदीला आलेल्या जोरदार प्रवाहामुळे संबंधित पुल पुन्हा वाहून गेल्याने लोकांची मोठी गैरसोय होत आहे. शेतकरी,विद्यार्थी हा जवळचा मार्ग असल्याने तुटलेल्या पुलावरून धोकादायक पद्धतीने यापुलावरून येजा करीत आहेत. यामुळे याठिकाणी एखादा अपघात घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
संबंधित पुलाची तातडीने नव्याने निर्मिती करण्यात येऊन लोकांना दिलासा देण्यात यावा अशी मागणी चितळी गावचे ग्रामस्थ बबरभाऊ बरकडे,रामचंद्र कुंभार,अधिक काळे,महादेव लोहार,बाळासो शेंडगे,दीपक नीचल, आनंद बरकडे,आकाश फडतरे, हरीदास नीचल,मालोजी पवार,प्रल्हाद सूर्यवंशी, संजय पवार, अमृत पवार,अर्जुन पवार यांनी केली आहे.