विज्ञान नाट्यस्पर्धेत भुतेश्वर विद्यामंदिर तृतीय

विज्ञान नाट्यस्पर्धेत भुतेश्वर विद्यामंदिर तृतीय
मायणी-प्रतिनिधी
नेहरू सायन्स सेंटर द्वारा आयोजित तालुका स्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, अंबवडे (ता. खटाव ) येथील भुतेश्वर विद्यामंदिरच्या विद्यार्थी कलावंतांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. प्रथमच नाट्य स्पर्धेत सहभागी होऊन यश मिळविल्याबद्दल विद्यार्थ्यांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.
सांस्कृतिक कार्य मंत्रालय (भारत सरकार ) अंगीकृत नेहरू सायन्स सेंटर द्वारा विज्ञान नाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. तालुका, जिल्हा, विभागीय व राज्य स्तरावर या स्पर्धा टप्प्याटप्प्याने होत असतात. खटाव तालुका स्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेचे आयोजन सोमेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज गुरसाळे येथे करण्यात आले. अंबवडे येथील भुतेश्वर विद्यामंदिरच्या कलावंत चमूने मुख्याध्यापक संजय जगताप यांच्या प्रेरणेने त्या नाट्य स्पर्धेत भाग घेतला. आरोग्य आणि स्वच्छता या गाभा घटकावर आधारित अंधविश्वास, अंधश्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांची सांगड घालत ‘ नव्हे नकुशी ती तर खुशी’ या विज्ञान नात्याचे सादरीकरण केले. त्यामध्ये ऋतुजा गायकवाड, प्राजक्ता पवार, संस्कृती बुधे, श्रावणी जाधव, मंजिरी इंगवले, प्रणाली धर्माधिकारी, मृण्मयी घाडगे, तन्मय खिलारे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यांना अर्चना माने, सुखदेव कारंडे यांनी मार्गदर्शन केले. कलाशिक्षक दुनेश सोनवलकर व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. सर्व विद्यार्थी कलावंत आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे मुख्याध्यापक संजय जगताप यांनी अभिनंदन केले. तसेच मायणी शिक्षण संस्थेचे चेअरमन सुरेंद्र गुदगे, सचिव सुधाकर कुबेर, संचालक एन. व्ही. कुबेर, दिगंबर पिटके, अंबवडे च्या सरपंच शोभाताई काकडे, उपसरपंच प्रमोद बर्गे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष विश्वजीत घाडगे आदीनी अभिनंदन केले.″