आपला जिल्हा

सुभेदार रामजी आंबेडकरांच्या स्मारकाचा प्रश्न हा प्रश्नच राहिला —–बाळासाहेब कांबळे

स्मारक उभारणीच्या उत्तर बाबत अनुयायी उत्सुक

सुभेदार रामजी आंबेडकरांच्या स्मारकाचा प्रश्न हा प्रश्नच राहिला —–बाळासाहेब कांबळे 

मायणी– प्रतिनिधी
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अखंड विचार कार्यातून संपूर्ण भारत वर्षामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व मानवतावादी परिवर्तन झाले. त्यांच्या जीवन कार्यामुळे हजारो वर्षे गुलामगिरीत खितपत पडलेल्या उपेक्षित वर्गाला उन्नतीचा,विकासाचा राजमार्ग सापडला. त्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण मायणी (ता. खटाव जिल्हा सातारा) व माहुली (तालुका खानापूर जिल्हा सांगली) येथे गेल्याने या गावांना ऐतिहासिक महत्त्व आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्रकार चांगदेव भवानराव खैरमोडे यांनी लिहिलेल्या चरित्र खंडात याबाबतची ऐतिहासिक नोंद सापडते.
सन १८९६ च्या सुमारास सरकारने दुष्काळी भागात तलावबांधणीची कामे सुरू केली. बाबासाहेबांचे वडील सुभेदार रामजी संकपाळ यांच्या देखरेखीखाली मायणी, गोरेगावं (ता. खटाव ) येथे तलावाचे काम सुरू झाले.त्यामुळे वयाच्या चौथ्या पाचव्या वर्षी बालभिवाच्या बालपणाचे काही दिवस या गावात गेले असल्याने भिवाच्या सोनपावलांनी या परिसरातील भूमी पावन झालेली आहे. त्यामुळे मायणी येथे सुभेदार रामजी आंबेडकर स्मारकाची मागणी आहे. याबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर केल्यानंतर त्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळून जागेची पाहणी झाली.मात्र अद्याप पुढील काहीच कार्यवाही न झाल्याने या स्मारकाचे काम कधी मार्गी लागणार? कारण या स्मारकाचा प्रश्न हा प्रश्न बनून राहिला उत्तर कधी असा सवाल  रमाई चरित्र लेखक बाळासाहेब कांबळे यांनी उपस्थित केला आहे.
सन २०१०पासून ते याबाबत पाठपुरावा करत असून अद्याप हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
मायणी, पाचवड या गावांना एक वेगळेच ऐतिहासिक महत्व आहे.रविवार दिनांक ४ एप्रिल १९२३ रोजी सकाळी नऊ वाजता चळवळीतीलअनेक लोक डॉ. बाबासाहेबांच्या मुंबई येथील खोलीत जमले होते. परदेशी उच्च शिक्षणामुळे बाबासाहेबांच्या हाती हार तुरे देऊन त्यांनी बाबासाहेबांचे स्वागत केले. समाज चळवळ, शिक्षण इत्यादी विषयावर चर्चा करून ती मंडळी निघाली त्यामध्ये चांगदेव भवानराव खैरमोडेही होते. त्यांना बाबासाहेबांनी थांबवून घेतले आणि त्यांचे वाचन, लेखन याविषयी विचारपूस केली, तेव्हा बाबासाहेबांनी आपले लहानपण, वाचन वगैरेबद्दल आठवणी सांगताना, ‘आपले बालपण मायणी, गोरेगाव (खटाव) व माहुली (खानापूर) येथे गेल्याचे सांगितले.
ही गावे अर्थातच पाचवड (तालुका खटाव) या गावाच्या शिवेवर म्हणजे चरित्रकार चांगदेव भवानराव खैरमोडे यांच्या जन्म गावाजवळची आहेत.
चरित्रकार चांगदेव खैरमोडे यांना उच्च शिक्षण घेत असताना अडचण निर्माण झाली होती यावेळी बहिष्कृत हितकारणी सभा यांच्या वतीने शिक्षण कार्य हाती घेतल्यानंतर डॉ बाबासाहेब यांनी त्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली. यानंतर खैरमोडे यांनी अनेक वर्षे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात कार्य केले. त्यांनी बाबासाहेबांच्या चरित्राचे १५ खंडाचे प्रदीर्घ लेखन कार्य केले आहे.
मायणी तालुका खटाव येथे प्रसिद्ध ब्रिटिशकालीन तलाव आहे. थंडीच्या दिवसात या तलावावर फ्लेमिंगो या परदेशी पक्ष्यांचे आगमन होते. (इयत्ता नववीच्या जुन्या अभ्यासक्रमात याविषयीच्या पाठाचा अंतर्भाव आहे.) या तलावाचे बांधकाम १८९६ च्या सुमारास सुभेदार रामजी सपकाळ म्हणजेच बाबासाहेबांच्या वडिलांच्या देखरेखीखाली झाले असल्याचा संदर्भ चांगदेव खैरमोडे चारित्र खंडात स्पष्टपणे आढळतोआहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उपेक्षित वर्गाच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी बहिष्कृत भारत, मूकनायक अशी पत्रे सुरू केली. यापैकी बहिष्कृत भारत या पत्राला पुरेशे वर्गणीदार मि ळाल्याने वर्षभरात ते पत्र बंद झाले. याशिवाय त्यावर पाचशे रुपयाचे कर्ज देखील झाले. मात्र या पत्राचे काही वर्गणीदार खूप प्रामाणिक आणि विश्वास होते . यापैकी मायणी येथील ज्योतीबा दारकू झोडगे हे एक होते. त्यांचा सुभेदारांशी परिचय होता. त्यांना बहिष्कृत भारत ची वर्गणी वेळेवर पाठवता आली नाही म्हणून त्यांनी नंतर वर्गणी बरोबर एक रुपया दंड म्हणून पाठवला.डॉ.बाबासाहेबांनी त्यांना या त्यांच्या प्रामाणिक कृत्याबद्दल पत्र पाठवून आभार मानले. झोडगे मास्तर म्हणून या परिसरात ते परिचित होते . डॉ. बाबासाहेबांनी पाठवलेल्या या पत्राची ते दररोज पूजा करत असत. हे पत्र त्यांच्यासोबत बरेच दिवस होते. १९४६ च्या दरम्यान झोडगे जेव्हा मुंबईला गेले तेव्हा त्यांनी हे पत्र खैरमोडे यांना दाखवले मात्र हळदी कुंकवाचे त्यावर डाग पडलेले असल्यामुळे त्यावरची काही अक्षरे मुजून गेली होती.
डॉ. बाबासाहेबांचे बालपण या परिसरात गेल्याने या परिसराला ऐतिहासिक महत्व आहे. हा ऐतिहासिक वारसा जपला जावा म्हणून येथे सुभेदार रामजी आंबेडकर स्मारक व्हावे अशी मागणी आहे.बालभिवाच्या चिमुकल्या पावलांनी पावन झालेल्या या भूमीतील ऐतिहासिक स्मृतींचे जतन व्हावे म्हणून येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी या परिसरात सुभेदार रामजी आंबेडकर स्मारक व्हावे म्हणून वारंवार मागणी करूनही आज अखेर त्याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
शासनाने लक्ष घालून विदयार्थी अभ्यासिका, विहार, भन्ते निवास असे सर्व सोयी सुविधा असलेले स्मारक लवकरात लवकर या भूमीत व्हावे. अशी मागणी होत आहे.

Download Aadvaith Global APP

मुख्य संपादक

सामाजिक सांकृतिक राजकिय कृषी व खेळ जगत बातम्यांचे व्यासपीठ भागातील बातम्या पाहण्यासाठी youtube channel==lokpravah news संपादक -- महेश तांबवेकर = 7709797534

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button