श्री सेवागिरीं चा वार्षिक रथोत्सव बुधवार 10 जानेवारीला.
सलग अकरा दिवस चालणाऱ विविध स्पर्धांचा रणसंग्राम

श्री सेवागिरीं चा वार्षिक रथोत्सव बुधवार 10 जानेवारीला.
सलग अकरा दिवस चालणाऱ विविध स्पर्धांचा रणसंग्राम
पुसेगाव -प्रतिनिधी
महाराष्ट्रासह विविध राज्यातील लाखों भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या पुसेगाव ता खटाव येथील प पु श्री सेवागिरी महाराजांचा यंदाचा वार्षिक रथोत्सव बुधवार दि 10 जानेवारी रोजी संपन्न होणार आहे अशी माहिती मठाधिपती प पु महंत सुंदरगिरी महाराज व देवस्थान ट्रस्ट चेअरमन रणधीर जाधव यांनी दिली.
यावर्षी शनिवार दि ६ जानेवारी ते मंगळवार दि १६ जानेवारी या कालावधीत महाराजांची वार्षिक यात्रा भरविण्यात येणार आहे. मानाच्या झेंडा मिरवणुकीने दि ६ रोजी यात्रे ला सुरुवात होणार आहे. यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा असलेली कार्यक्रम पत्रिका व “श्री सेवागिरी” या दिनदर्शिकाचे आज जाहीर प्रकाशन करण्यात आले.यावेळी मठाधिपती प पु सुंदरगिरी महाराज,ट्रस्ट चेअरमन रणधीर जाधव,विश्वस्त डॉ सुरेश जाधव, संतोष(बाळासाहेब)जाधव,संतोष वाघ,सचिन देशमुख व गौरव जाधव यांच्यासह माजी चेअरमन, विश्वस्त, पुसेगावतील ग्रामस्थ भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाविक भक्त आबालवृद्ध नागरिक,महिला,तरुण तरुणी,खेळाडू ,कलाकार,बैलगाड्या ,श्वान प्रेमी व कुस्ती प्रेमी यांच्यासाठी यात्रा कालावधीत आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांची पर्वणी ठरणार आहे.दि ३ ते ६ जानेवारी दरम्यान क्रिकेट स्पर्धा, दि ६ व ७ जानेवारी रोजी अखिल भारतीय दिवसरात्र शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धा, सोमवार दि ८ रोजी बैलगाड्यांच्या जंगी शर्यती,मंगळवार दि ९ रोजी कुस्त्यांचे मैदान होणार आहे.
बुधवार दि १० रोजी यात्रेचा मुख्यदिवस असून यादिवशी महाराजांचा रथोत्सव सोहळा संपन्न होणार आहे.
दि ९ ते १४ जानेवारी दरम्यान राज्यस्तरीय श्री सेवागिरी कृषी प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. गुरुवार दि ११ रोजी भूपाळी ते भैरवी हा कार्यक्रम तर शुक्रवार दि १२ रोजी श्री सेवागिरी युवामहोत्सव,दि १२ व १३ रोजी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा, शनिवार दि १३ रोजी श्वान प्रदर्शन तर दि १४ रोजी श्री सेवागिरी मरेथॉन तसेच श्वान शर्यती होणार आहेत.सोमवार दि १५ रोजी महिलांसाठी न्यू होम मिनिस्टर हा कार्यक्रम होणार आहे. दि १५ रोजी बक्षीस पात्र जनावरांच्या नोंदी तर मंगळवार दि १६ रोजी बक्षीसपात्र जनावरांची निवड व त्याच दिवशी बक्षीस वितरण समारंभाने यात्रेची सांगता होणार असल्याचे विश्वस्तांनी सांगितले.