झांजर ने परंपरा मोडून नवी वाट निर्माण केली– डॉ. केशव देशमुख
झांजर पाडवा विशेषांकाचे प्रकाशन

-
झांजर ने परंपरा मोडून नवी वाट निर्माण केली– डॉ. केशव देशमुख
झांजर पाडवा विशेषांकाचे प्रकाशन
पुसेगाव प्रतिनिधी— पंकज कदम
दिवाळी पाडव्याला अनेक अंक प्रकाशित होत असतात. मात्र ‘झांजर’या विशेषांकाच्या रूपाने वाड्:मय विश्वात नव्या पर्वाला सुरूवात झाली आहे. या अंकाला मातीचा सुवास आहे. या अंकाने परंपरा मोडून नवी वाट निर्माण केली आहे. ही वाट वैचारिक चळवळ निर्माण करणारी आहे. असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. केशव देशमुख यांनी व्यक्त केले.
दिनेश फडतरे संपादित ‘झांजर’ या पाडवा विशेषांकाचे प्रकाशन डॉ. देशमुख यांच्या हस्ते पत्रकार भवनाच्या सभागृहात झाले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदिप सांगळे, मसापचे कार्यवाह वि. दा. पिंगळे उपस्थित होते.
डॉ. देशमुख म्हणाले, झांजर विशेषांकामुळे गुढी पाडवा हा दिवाळी पहाट झाला आहे. अंकातील लेखांत वेगळेपण आहे. त्यामुळे हा अंका विचारांचा जागर आहे. स्त्रीवादापासून कायद्यापर्यंत आणि महाभारतापासून राम राज्यापर्यंतचा आशय आहे. लिहित्या माणसांना जोडणारा हा अंक आहे. अंकात अत्मियता असून ग्रामीण संस्कृतीतील माणूसकीने भिजलेला हा अंक आहे. अंकातील नोंदी वाड्:मयीन, सांस्कृतीक, सामाजिक आणि ऐतिहासिक आहेत. या अंकामुळे दिवाळी अंकाप्रमाणेच पाडवा विशेषांकही वाढतील, असा विश्वासही डॉ. केशव देशमुख यांनी व्यक्त केला.
सुनीताराजे पवार म्हणाल्या, ग्रामीण संस्कृतीचा धांडोळा घेणारा हा अंक एका अर्थाने गुढीपाडव्याचे वैचारिक झुजुमूजू आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तांवर प्रकाशित होणारा ‘झांजर’ हा राज्यातील एकमेव अंक आहे. त्यामुळे या अंकाला वाड्:मयीन महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्यभरातील लेखक या अंकातून व्यक्त होत आहेत. हा अंक म्हणजे लेखकांचे वैचारिक व्यासपीठ बनले आहे. डॉ. संदिप सांगळे म्हणाले, ग्रमीण संस्कृतीचे वैभव अफाट आहे. मात्र अलीकडच्या काळात या संस्कृतीतही प्रचंड बदल झाले आहेत. संस्कृतीतील वैभव लयात जात आहे. त्यामुळे ग्रामीण संस्कृतीचे वैभव टिकविणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
वि. दा. पिंगळे म्हणाले, झांजरच्या रूपाने वाचकांना वैचारिक फराळ उपलब्ध झाला आहे. हा फराळ बैद्धिक व सामाजिक सुदृढता निर्माण करणारा आहे. या अंकातून गाव संस्कृतीचा संपूर्ण पट उलगडला आहे. हा अंक म्हणजे वैचारिकतेचा ठेवा आहे. लेखक दत्ता केंजळे यांनी मनोगत व्यक्त केले. संपादक दिनेश फडतरे यांनी प्रास्ताविक केले. गायिका ऋचा बोंद्रे यांनी ईशस्तवन सादर केले. संजय ऐलवाड यांनी सुत्रसंचालन केले. अविनाश फडतरे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाला दत्ता केंजळे,राम कुदळे,जयदीप ननावरे, लक्ष्मीकांत रांजणे, बाळासाहेब जाधव,नितीन जाधव, नितीन शिंदे,अनघा लेले,ललिता सबनीस, बाळकृष्ण बाचल, आण्णा गुजर इ.मान्यवर हजर होते.