आपली स्वप्ने साकारताना आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवा—– संजीव साळुंखे
समाजभूषण हणमंतराव साळुंखे विद्यालयात अभिष्टचिंतन सोहळा संपन्न

आपली स्वप्ने साकारताना आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवा– संजीव साळुंखे
समाजभूषण हणमंतराव साळुंखे विद्यालयात अभिष्टचिंतन सोहळा संपन्न
कलेढोण— प्रतिनिधी
आपले स्वप्न साकारताना आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवा असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व हणमंतराव साळुंखे पतसंस्थेचे चेअरमन संजीव साळुंखे यांनी केले.ते कलेढोण येथील समाजभूषण हणमंतराव साळुंखे विद्यालयात एस.एस.सी. विद्यार्थ्यांच्या अभिष्टचिंतन कार्यक्रमप्रसंगी बोलत होते
.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार व खटाव माण ऍग्रो पडळ साखर कारखान्याचे चेअरमन प्रभाकर घार्गे हे होते तर सातारा येथील शिक्षण विस्तार अधिकारी (माध्यमिक) दत्तात्रय गिरी हे प्रमुख पाहुणे होते.
सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप – प्रज्वलन करण्यात आले. यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी डॉ.आनंदकुमार बाबर व उद्योजक दिपक कवडे,संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एन.पवार,सचिव मिलिंद साळुंखे,सुहास शेटे,सरपंच सौ. प्रितीताई शेटे,ग्रामपंचायत सदस्य बरकत शिकलगार,राजन लिगाडे,डॉ.खाशाबा पवार,राजाराम दबडे,माजी मुख्याध्यापक मालोजीराजे कुंभार,पंढरीनाथ गायकवाड,माजी ज्येष्ठ लिपिक आर. के.कदम,पांडुरंग लोहार,पांडुरंग तारळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती
. प्रास्ताविक मुख्याध्यापक श्रीमंत सानप यांनी केले. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.त्यानंतर धनंजय पिसे यांनी विद्यार्थ्यांच्या बक्षिसांची यादी प्रसिद्ध केली त्याप्रमाणे मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.एस.एस. सी.मधील विद्यार्थ्यांनी शाळेला भेटवस्तू प्रदान केल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. संजीव साळुंखे म्हणाले, शाळेचा माजी विद्यार्थी दिपक कवडे याने अत्यंत गरिबीतून परिस्थितीशी संघर्ष करुन प्रगती केली.आई वडिलांच्या कष्टाची जाणीव त्यांनी ठेवली व प्रगती केली.आज ते बार्शी मधील प्रसिद्ध उद्योजक आहेत. त्यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा.अत्यंत गरिबीतून त्यांनी वाटचाल केली. दुसरे माजी विद्यार्थी डॉ.आनंदराव बाबर यांचे शिक्षण त्यांच्या आजोळी म्हणजे कलेढोण येथे झाले. त्यांनीही अत्यंत खडतर परिस्थितीतून प्रगती केली व आज ते नामांकित डॉक्टर आहेत.या दोघांचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा म्हणून त्यांना खास निमंत्रित करण्यात आले आहे. तुम्हाला जीवनात अनेक परीक्षा द्यायच्या आहेत. दहावीची परिक्षा ही तर सुरुवात आहे. एकतर चांगले शिक्षण घ्या किंवा कष्टाची तयारी ठेवा व आपली प्रगती करा असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षपदावरून बोलताना माजी आमदार प्रभाकर घार्गे म्हणाले,हे विद्यालय स्व.तात्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उभे केले. या भागातील विद्यार्थ्यांना कलेढोण मध्येच शिक्षण मिळावे हा त्यांचा उद्देश होता.त्यांनी द्राक्षबागा उभ्या केल्या व शेतकऱ्यांच्या जीवनात सुधारणा केली. आपणाला नव्या जगाबरोबर जावे लागणार आहे. ध्येय उच्च ठेवा व आपल्या शाळेचा नाव लौकीक वाढवा.असे ते म्हणाले. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी (माध्यमिक) दत्तात्रय गिरी,संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस.एन.पवार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. पर्यवेक्षक प्रमोद लावंड यांनी आभार मानले.