हजारो भाविकांचे श्रद्धास्थान :श्री धनगर विठोबा

हजारो भाविकांचे श्रद्धास्थान :श्री धनगर विठोबा
आज यात्रेचा मुख्य दिवस
मायणी: -प्रतिनिधी
सालाबादप्रमाणे गत शनिवार २ एप्रिल पासून सुरु असणाऱ्या या यात्रेत सालाबादप्रमाणे देवाची पालखी व सासन काठ्यांचे मंदिरात आगमन व पूजन ,देवाचा धाकटा छबिना ,थोरला छबिना यासह विविध परंपरागत कार्याक्रमांसह या यात्रेत रंगत आली आहे.
पारंपरिक चालणाऱ्या या कार्यक्रमांचे आकर्षण फक्त मायणीतच नव्हे तर महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र या राज्यातील भक्तां मध्येही आहे.
यात्रेच्या आजच्या शुक्रवार या मुख्य दिवशी सकाळी पाकळणी सह गंजी नृत्य ,दुपारी १२ नंतर सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच कोरोना व देशातील परिस्थितीवर देवाची भाकणूक काय होते.याची उत्सुकता भविकांमध्ये आहे. सायंकाळी ६ वाजता होणार आहे. यात्रेच्या उत्सुकतेने भक्तांच्या हजारोंच्या संख्येने मंदिर परिसर गजबजलेला आहे.
संपूर्ण मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली असल्याने परिसराला एक वेगळीच झळाळी आली आहे. नवसाला पावणारा देव अशी ख्याती असलेल्या या श्री धनगर विठोबा मंदिराची आख्यायिका अशी आहे:-
” एकदा एक या भागातील धनगर कोकणात गेला असता ,त्यावेळी एका ठिकाणी एका गाईला दलदलीत अडकलेले त्याने पहिले ,परंतु तिच्या भोवती असणारे येथील लोक फक्त हळहळ व्यक्त करण्या खेरीज काहीच करीत नव्हते. तेव्हा त्या धनगराने त्या गाईला स्वतः त्या दलडलीतून सुखरूप बाहेर काढले. त्याचे सत्कार्य तेथेच असणाऱ्या झाडांच्या जवळ उभा असलेला कोकणी विठोबा पाहतो . त्यावर प्रसन्न होतो व त्या गाईच्या पायात दगड बनून अडकून बसतो . आपले जीव वाचवणाऱ्या आपल्या जीवनदात्यासोबत त्या धनगर सोबत ती गाई मायणी या ठिकाणी येते.
मायणी येथे आल्या नंतर तो दगड रुपी कोकणी विठोबा गाईच्या पायातुन पडून या आजच्या मंदिराच्या ठिकाणी रुतून बसतो . व येथील लोकांना स्वप्नात दृष्टांत देऊन आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतो.
मायणी येथील धनगरी समाजाची या श्री विठोबा देवांवर अपार श्रद्धा असल्याने लोकांनी या ठिकाणी एकत्र येऊन मंदिर बांधले . आज या मंदिराची भव्यता प्रचंड असून सुनियोजन असणारे एक आदर्श देवस्थान म्हणून श्री धनगर विठोबा देवस्थान प्रसिद्ध आहे.
अपार श्रद्धेचे व देशातील महाराष्ट्रीयन धनगरी लोककलेची परंपरा जपणारे ठिकाण म्हणून मायणी येथील श्री विठोबा देवस्थान प्रसिद्ध आहे. वर्षभर अनेक धार्मिक उपक्रमांची रेलचेल याठिकाणी असते. नित्य नियमाने पहाटेची आरती,पौर्णिमा ,रविवारी देवाची विशेष पूजेच्या निमित्ताने थोरल्या ,धाकट्या देवांची विशेष सजावट व विधिवत धार्मिक पूजा याठिकाणी होत असते. परिसरातील मायक्का देवीचे मंदिरही भागातील ग्रामस्थांसाठी पूजनीय आहे.
गेल्या अनेक वर्षातून धनगर बांधव व ग्रामस्थांनी एकत्र येत श्री विठोबा देवस्थान ट्रस्ट च्या माध्यमातून मंदिर परिसराचा कायापालट केला असून मंदिर परिसरात संपूर्ण बांधकाम करण्यात आले असून ठीक ठिकाणी स्वागत कामानीही बांधण्यात आल्या आहेत .तसेच श्री धनगर विठोबा सांस्कृतिक मंगल कार्यालय ही याठिकाणी बांधण्यात आले असून यामुळे अनेक नागरिकांना नाममात्र शुल्कात कार्यालयात आपला कौटुंबिक कार्यक्रम साजरा करता येतो. त्याचबरोबर मायणी चांदणी चौक परिसरात व्यापारी संकुलन ट्रस्ट तर्फ़े बांधण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
असे हे श्रद्धेचे माहेरघर असणाऱ्या हजारो लोकांचे श्रध्दास्थळ आज यात्रेच्या निमित्ताने खुलले असून कोरोना मुळे निर्बंध मुक्त भाविक मोठ्या संख्येने व उत्स्फूर्तपणे मायणी येथे श्री धनगर विठोबा यात्रेनिमित्त एकत्र येत आहेत.
गेल्या शनिवार पासून हजारो लोकांनी येथील विठोबा देवस्थानचे दर्शन घेतले असून विविध गावाच्या धनगर बांधवानी येथे आपले गजी नृत्य सादर करीत आहेत . आज होणाऱ्या मुख्य दिवसभराच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी येथील श्री धनगर विठोबा देवस्थान ट्रस्टने केली आहे ,यानिमित्ताने मायणी नगरीत आलेल्या सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत.