प. पू. सेवागिरी महाराजांचा आज रथोत्सव

प. पू. सेवागिरी महाराजांचा आज रथोत्सव
महाराष्ट्रासह विविध राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या प.पू. सद्गुरू श्री. सेवागिरी महाराजांचे पुसेगाव येथे १९०५ मध्ये शुभागमन झाले. त्यांच्या समाधीच्या दर्शनासाठी दर गुरुवारी आणि अमावास्येला वारी करणारे असंख्य भक्त आहेत. प्रतिवर्षी मार्गशीर्ष वद्य चतुर्दशीला महाराजांचा संजीवन समाधी दिन असतो. या दिवशी श्री महाराजांचा रथोत्सव उत्साहात साजरा केला जातो. या वर्षी, बुधवार, दि. १० जानेवारी रोजी सेवागिरी महाराजांचा रथोत्सव आहे. यानिमित्त…
या रथोत्सवाला लाखो भाविकांचा महापूर पुसेगावला लोटतो. सुबक बनविलेल्या सागवानी रथातून महाराजांच्या प्रतिमेची व चांदीच्या पादुकांची मिरवणूक निघते. मिरवणुकीत सनई-चौघडा, ढोल, लेझीम व बँड पथक, हत्ती, घोडे व आकर्षक रथ यांची साथ असते. या दिवशी समाधी व रथाचे दर्शन घ्यायचे आणि आपल्या भावसुमनांची माळ नोटांच्या लौकिक स्वरूपात रथावर अर्पण करायची हा नियम पाळणारे लाखो भक्त महाराजांच्या आशीर्वादाने पावन होतात. मिरवणूक सुरू असताना श्री सेवागिरी महाराज की जय या जयजयकाराने सर्व आसमंत दुमदुमून जातो. यात्रेनिमित्त राज्यस्तरीय शुटिंग, व्हॉलीबॉल स्पर्धा, कुस्त्यांचा जंगी आखाडा, राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा, राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन, जिल्हास्तरीय युवा महोत्सव, शरीरसौष्ठव स्पर्धा, खिलार जनावरांचे प्रदर्शन, श्वान प्रदर्शन, श्वान शर्यती व बक्षीस समारंभ इत्यादी कार्यक्रमांचे नियोजन श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टमार्फत केले जाते. रथोत्सवासाठी कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरात व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात
श्री सेवागिरी महाराजांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत प्रभावी व चेहरा बोलका होता. त्यांच्या अमोघ वाणीतून तत्त्वज्ञानाचे दर्शन घडत असे. तेरी माँ मरी म्हणजे अज्ञान दूर होवो असे ते नेहमी म्हणत. सेवा, श्रध्दा व नम्रता हीच खरी उपासना व लेने को हरिनाम, देने को अन्नदान अशी महाराजांची शिकवण होती. शाळेतील मुले त्यांना प्रिय होती. ते मुलांना खाऊ वाटत. बागेला पाणी देणे, फुले तोडणे, मंदिराची झाडलोट करणे ही सेवाभावी वृत्ती त्यांच्या ठायी होती. सध्याच्या कलियुगात ताणतणावातून चित्त स्थिर ठेवून अत्यानंदाच्या पायऱ्या कशा उतराव्यात, जीवनाचा राजमार्ग कसा निश्चित करावा, मानवाने आपले अंतर्बाह्य जीवन आनंदी कसे जगावे, यासाठी महाराजांनी उपदेश केला. श्री महाराजांनी शनिवार, दि. १०/१/१९४८ रोजी पुसेगाव येथे संजीवन समाधी घेतली.
सन १९०५ ते १९४८ या कालखंडामध्ये श्री महाराजांनी पुसेगाव व परिसरामध्ये प्रेम व करुणा पेरून माणुसकी पिकवली. मानवी समाजातील क्षीण झालेला पुरुषार्थ जागविला. भक्तीची, सत्कर्माची, श्रध्देची व सामूहिक उन्नतीबरोबरच आत्मोन्नतीची बीजे पेरली.
गुरू तेथे ज्ञान । ज्ञानी आत्मदर्शन ।
दर्शने समाधान । अथि जैसे ।।
या संत ज्ञानेश्वर माउलींच्या ओवीप्रमाणे प.पू. सद्गुरू श्री सेवागिरी महाराजांचे कृपाशीर्वाद दिनदर्शिकेच्या माध्यमातून सर्वांच्या घरी सदैव राहावेत ही प.पू.श्री. सेवागिरी महाराजांचे चरणी विनम्र प्रार्थना