मराठा समाजाचा आमरण उपोषणाचा इशारा

मराठा समाजाचा आमरण उपोषणाचा इशारा
जिल्ह्यातील नेत्यांनी उपोषण स्थळी भेट न दिल्याने दिला इशारा
मायणी-प्रतिनिधी
मायणी ता. खटाव येथील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने मराठा समाजास आरक्षण मिळावे या मागणीसाठी सात सप्टेंबर पासून साखळी उपोषण सुरू आहे मात्र या उपोषणास जिल्ह्यातील एकाही राजकीय नेत्याने भेट देऊन त्यांची चौकशी न केल्याबद्दल समस्त मराठा समाजाच्या मनात संतापाच्या भावना व्यक्त केल्या असून येत्या सोमवार पर्यंत यातील एकही राजकीय नेता उपोषणस्थळी न आल्यास मंगळवार दि. १९ पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा समस्त मराठा संघटनेचे अध्यक्ष डॉ.विकास देशमुख यांनी मायणी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
पत्रकारांना साखळी उपोषणा संदर्भात माहिती देताना डॉ. विकास देशमुख म्हणाले, जिल्ह्याला सत्ताधारी पक्षाचे विधानसभेचे माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री ना.शंभूराजे देसाई, खा. छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले,जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई आदी मातब्बर नेते मंडळी असताना गेले दहा दिवस येथे साखळी उपोषण सुरू असून देखील त्यांनी सदर ठिकाणी साखळी उपोषण करणाऱ्या आपल्या मराठा समाज बांधवांची साधी चौकशीही केली नाही याची आम्हास खंत वाटते. सातारा जिल्ह्यातील नेते अन्य जिल्ह्यात झालेल्या मराठा आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी जातात मात्र खटाव तालुक्यातील दुष्काळी भागातील मराठा बांधव उपोषण करत आहे याचे त्यांना काहीच गांभीर्य वाटत नाही. म्हणूनच सोमवार पर्यंत वरील नेत्यांनी मायणी येथील साखळी उपोषणास भेट देऊन आमच्या मागण्या शासनापर्यंत न पोहोचवल्यास मंगळवारपासून मायणीतील सकल मराठा समाज बांधवांनी आमरण उपोषणाचा ठाम निर्णय घेतला आहे.
सदर उपोषणास मायणीसह खटाव-माण तालुक्यातील त्याचप्रमाणे शेजारील खानापूर तालुक्यातील मराठा बांधव देखील दररोज येऊन भेटी देत आहेत विधान परिषदेचे माजी आमदार प्रभाकर घार्गे, माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख माजी आमदार डॉ. दिलीप येळगांवकर ,जि.प.सदस्य सुरेंद्र गुदगे,सौ.सुरेखा पखाले, बहुजन क्रांती दल, शेतकरी संघटना, आर.पी.आय., या सह परिसरातील इतर समाजातील बांधव देखील येऊन पाठिंबा देत आहेत. सदर आंदोलन अत्यंत शांततेच्या स्वरूपात मायणी येथे सुरू आहे.
दरम्यान मायणी येथे चालू असलेल्या मराठा बांधवांच्या साखळी उपोषणाची दखल विधानसभेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी घेतली असून ते सोमवार दिनांक 18 रोजी सायंकाळी सहा वाजता मायणी येथील उपोषणकर्त्यांशी चर्चा करणार आहेत